नसतेस घरी तू जेव्हा - मौनाची भाषांतरे, संदिप खरे (Nastes Ghari Tu Jenvha - Sandip Khare)

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो

एकाकी केविलवाणा
मी घरभर भिरभिर फिरतो
घुमघुमत्या आवाजाने
भिंतींना हाका देतो

तव मिठीत विरघळणार्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे
मी तसा आकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

No comments:

Post a Comment