खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावेजयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
- साने गुरुजी
Kelyane deshatan ..(Pudhe kay aahe?..hi mhan aahe ki wakprachar aahe?) Aani yacha artha kay aahe? krupa karun sanga
ReplyDeleteHi Sane gurujinchi kavita ahe arth mhanje jagala prem vatane haach khara dharm ahe.
ReplyDelete