कणा - कुसुमाग्रज (Kana By Kusumagraj)

कणा...

'ओळखलत का सर मला'--पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
कळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली—

भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले—

कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला—

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

मन उधाण वाऱ्याचे....(Man Udhan Varyache)

मन उधाण वाऱ्याचे
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते…
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… …..

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते…………

कसे सरतील सये - कवी संदीप खरे (Kase Sartil Saye By Sandip Khare)

कसे सरतील सये
माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग
सलतील ना !

गुलाबाची फुलं दोन
रोज राती डोळ्यावर
मुसूमुसू पाणी सांग
भरतील ना !

पावसाच्या धारा-धारा मोजताना दिस सारा
रीते रीते मन तुझे उरे
ओठभर हसे-हसे उरातून वेडेपिसे
खोलखोल कोण आत झुरे

आता जरा आळीमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखाउन हसशील ना || १ ||

कोण तुझ्या सौदातुन उभे असे सामसूम
चिड़ी चुप सुनसान दिवा
आता सांज ढलेलच आणि पुन्हा छलेलच
नभातुन गोरा चांदवा

चाँदन्याचे कोटीकण
आठवांचे ओले सण
रोज रोज निजभर भरतील ना || २ ||

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
झडे सर काचभर तडा
तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा

पड़े माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातुन
जातानाही पाय भर मखमल ना || 3 ||

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
मालोनिया अबोलीची फुले
देहभर हलु देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले

जरा घन झुरू देना
वारा गुदमरु देना
तेंव्हा नभ धरा सारी भिजवील ना || ४ ||

- कवी संदीप खरे